अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर सचिवपदी विजय बनसुर यांची फेरनिवड
बेळगाव (वार्ता) : माझी संघटना माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकाने कार्य केले तर नक्कीच ती संघटना नावारूपाला येते. आज नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या संचालक मंडळींनी शपथ घेतली असून पुढील वर्षभर समाजाप्रती निष्ठा ठेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर व्हा, असा सल्ला जायंट्स फेडरेशनचे विभागीय संचालक मदन बामणे यांनी दिला.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा अधिकारग्रहण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर नूतन अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, विभागीय संचालक मदन बामणे, माजी अध्यक्ष सुनिल भोसले, नूतन सचिव विजय बनसुर होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिया प्रज्वलित करून जायंट्सच्या प्रार्थनेने झाली.
उपस्थितांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेडरेशन संचालक शिवराज पाटील यांनी केले.
कोव्हिड परिस्थितीमुळे २०२१-२२ सालाकरिता पुन्हा संजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली.
अधिकारग्रहण अधिकारी म्हणून मदन बामणे यांनी पहिल्यांदा नूतन सदस्य पद्मप्रसाद हुली यांना शपथ दिली.
त्यानंतर संचालक राजू बांदिवडेकर, अनिल चौगुले, राहुल बेलवलकर, दिगंबर किल्लेकर, भाऊ किल्लेकर, अजित कोकणे, अनंत हावळ, सुनिल चौगुले, मधू बेळगावकर, पुंडलिक पावशे यांना शपथ दिली.
अंतर्गत उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, बाह्य उपाध्यक्ष सुनिल मूतगेकर, खजिनदार लक्ष्मण शिंदे, सचिव विजय बनसुर यांनी शपथ घेतली.
शेवटी अध्यक्षपदाची शपथ संजय पाटील यांना देण्यात आली.
नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन मोहन कारेकर मदन बामणे आणि सुनिल भोसले यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यानंतर नूतन अध्यक्ष संजय पाटील यांनी पुढील वर्षभर प्रत्येक सदस्याच्या सहकार्याने आपली कारकीर्द यशस्वी करू असे सांगितले.
मोहन कारेकर, सुनिल भोसले आणि डॉ विनोद गायकवाड यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त केले.
यावेळी जायंट्स सखीच्या पदाधिकारी, जायंट्स मेनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार विजय बनसुर यांनी मांडले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.