

येळ्ळूर येथे ४ मे १८९५ रोजी जन्मलेल्या गुरुवर्य शामराव गोविंदराव देसाई यांनी सत्यशोधक, शिक्षण, समाजजागृती आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाचा इतिहास बदलला. बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची आवड जपून त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली, परंतु अंधश्रद्धा आणि अन्यायाविरोधात लढण्याच्या इच्छेने ते सामाजिक कार्यात उतरले.
अंत:करणाची तळमळ व स्वार्थत्याग नि कष्ट सोसण्याची तयारी यामुळे ते बहुजन समाजाच्या आदरास, प्रेमास, विश्वासास पात्र ठरले. गुरुवर्य शामराव देसाई यांनी अनेक चळवळी केल्या. अनेक संस्था, संघटना, सहकारी पतपेढी, वाचनालय व इतर सुधारणा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राम सुधारणा झाली. आश्चर्याची बाब म्हणजे हे लोण येळ्ळूरच्या आसपास भागात अल्पावधीतच पसरले. शिक्षणाचा प्रसार झाला आणि साक्षरता वाढली.
राजर्षी शाहू महाराजांच्या ब्राह्मणेत्तर चळवळीपासून प्रेरणा घेत त्यांनी पत्रकारिता, निवडणुकांचे राजकारण आणि संघटन बांधणी यांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा ठरविली. १९२१ रोजी सुरू झालेल्या ‘राष्ट्रवीर’ या वर्तमानपत्राच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.
शिक्षण प्रसार हेच समाजउद्धाराचे मूळ मानून १९४१ साली त्यांनी बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून २७९ शाळा उभारल्या गेल्या आणि ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले.
सहकार चळवळीतही त्यांचे योगदान निर्णायक ठरले. दि मराठा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक, तसेच अनेक संस्थांच्या स्थापनेत त्यांचे मार्गदर्शन होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील यांसारख्या दिग्गजांशी त्यांचे जवळचे संबंध होते. वक्ते, लेखक आणि संघटक म्हणून त्यांनी बहुजन समाजाला स्वाभिमान, शिक्षण आणि संघटित शक्ती बहाल केली.
त्यांच्या कार्यामुळे बेळगाव आणि आसपासचा प्रदेश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हालचालींचे केंद्र बनला. त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वार्थत्याग, ध्येयनिष्ठा आणि समाजहितासाठी झटणाऱ्या विचारांचे प्रतीक ठरले.
Belgaum Varta Belgaum Varta