
बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा रस्ता डांबराची वाहतूक करणाऱ्या वाहनातील डांबर रस्त्यावर पडून खडबडीत झाला असून या रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी समिती कार्यकर्ते मनोहर हुंदरे यांनी केली आहे.
अलतगा फाटा ते अगसगे या रस्त्यावर डांबर वाहतूक करणाऱ्या गाड्या येजा करीत असतात त्याचबरोबर या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक सारख्या वाहनांची देखील वर्दळ वाढली आहे. त्याचबरोबर खडी, वाळू, माती वाहतूक करणारी अवजड वाहने देखील या रस्त्यावरून ये -जा करीत त्यामुळे या रस्त्यावर खड्डे व डांबर पडून रस्ता पूर्णपणे खडबडीत झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. सदर रस्त्यावर लहान मोठे अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील दोन वर्षात या रस्त्यावरील रस्ते अपघातात चार ते पाच युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या परिस्थितीत अवघड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यावर पडलेला डांबर यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे तरी संबंधित खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा व वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी समिती कार्यकर्ते मनोहर हुंदरे यांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta