
बेळगाव : उद्या सोमवार पासून बेळगावात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या अधिवेशनात सुवर्णसौध आवारात सभाध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात येणार आहे, नेहमीप्रमाणे यावर्षीही हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध आकर्षक रोषणाईने झळाळून निघाले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन अधिवेशन काळातील प्रत्येक कामकाजावर जातीने लक्ष ठेवून काम करत आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून साडेचार कोटी रुपये अनुदानातून सुवर्णसौध परिसरात भव्य पार्क निर्माण करण्यात आले आहे. याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, अधिकारी व इतर मान्यवरांसाठी सरकारी इमारती, खासगी हॉटेल्समधील 3 हजार खोल्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. तसेच 700 वाहनेही राखीव ठेवण्यात आली असून कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिवेशनासाठी 7 ते 8 हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 3 कि. मी. पर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून आंदोलनासाठी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यावर स्वत: पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta