
बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर काल, ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेली दडपशाही आणि अटकेची कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारच्या या लोकशाहीविरोधी वागणुकीचा सीमाभागातील मराठी माणूस तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधव केवळ भाषेच्या आधारावर महाराष्ट्रात सामील होण्याची न्याय्य आणि संविधानिक मागणी करत आहेत. सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असतानाही बेळगावचे नामांतर बेळगावी असे केले त्यानंतर बेळगावममध्ये विधानसौध बांधून तिथेच हिवाळी अधिवेशन भरवून मुद्दामहून मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्याचे कृत्य दरवर्षी कर्नाटक सरकार करत असते आणि याच अधिवेशनाला प्रत्युत्तर देणाऱ्या महामेळाव्यासारख्या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने चाललेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारत महामेळाव्यास उपस्थित कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून अटक करणे, हे अत्यंत संतापजनक आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्ष आणि बेळगावचे शिवसैनिक म्हणून कर्नाटक प्रशासनाच्या या अत्याचारी आणि मराठीविरोधी कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य मागणीला आणि आमच्या लढ्याला शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसोबतच, पक्षप्रमुख श्री. उद्धव साहेब आपला ही सीमावासियांना वेळोवेळी कायमस्वरूपी खंबीर पाठिंबा राहिलेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आपणास विनंती करतो की, सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या लढाईत आणि रस्त्यावरच्या संघर्षात शिवसेना मराठी भाषिकांच्या पाठीशी यापुढेही अशीच खंबीरपणे उभी राहील याचा विश्वास आहे तसेच आपण आपल्या नेतृत्वात या संपूर्ण घटनेचा केवळ निषेध न करता, यापुढे शिवसेना सीमाभागातील मराठी बांधवांच्या स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्रात विलीन होण्याच्या त्यांच्या अंतिम उद्दिष्टासाठी अधिक सक्रियपणे उभे रहावे, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले.
यावेळी युवासेनेचे विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हारी पावशे, वैभव कामत, अद्वैत माने, जय पावशे, सक्षम कंग्राळकर, विनायक पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta