
बेळगाव : कर्नाटकातील काही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र, बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या विषयी मनात नेहमीच आकस असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काल दिवसभर सुवर्णसौध मध्ये बेळगाव शहरात मराठी भाषिक आणि महाराष्ट्रीय एकिकरण समितीने केलेल्या आंदोलनाची सर्वांमध्ये जोरदार चर्चा होती. दरम्यान कालच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनाचे पडसाद आज मंगळवारी विधान परिषदेत एका वेगळ्याच कारणामुळे पाहायला मिळाले.
सुवर्णसौध समोर आज शेतकरी तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विधान परिषदेतील विरोधी पक्षातील सदस्यांनीही भाग घेतला होता. आंदोलनात भाग घेतल्यानंतर सभागृहात आलेल्या पिवळा फेटा आणि अंगावर हिरवी शाल परिधान करून आलेल्या विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना पाहून काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यांनी आपण महाराष्ट्र एकीकरण समितीचे समर्थक आहात का? आपण हा फेटा का घालून आला आहात? असा आरोप केला.
यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांनी आपणाला हिरवी शाल आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी काहीच घेणे देणे नाही, असे सांगून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीही घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळात भर घातली. सभागृहात होत असलेली घोषणाबाजी आणि गोंधळाचे वातावरण पाहून,सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले.
मात्र आजच्या या प्रकारामुळे कर्नाटकातील लोकप्रतिनिधींमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विषयी असलेली असूया स्पष्टपणे दिसून आली.
Belgaum Varta Belgaum Varta