Thursday , December 11 2025
Breaking News

…तर शहाजी महाराजांच्या समाधीचा शोधही लागला नसता : आम. मारुतीराव मुळे

Spread the love

 

बेळगाव (श्रीकांत काकतीकर) : छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेचे ध्येय शहाजी महाराजांनी दिले. शहाजीराजांनी दक्षिणेत अनेक वर्ष व्यतीत केले. बेंगळूर शहराच्या विकासाचा पाया शहाजीराजांनी रचला. गोदेगेरी येथील गावकऱ्यांना जंगली श्वापदांचा होणारा त्रास रोखण्यासाठी शिकारीला जात असताना घोड्यावरून पडून गोदेगेरी येथे शहाजीराजांचा मृत्यू झाला.

गोदेगेरी येथे एका दगडाच्या स्वरूपात असलेल्या समाधीचा शोध तात्कालीन केंद्रीय मंत्री पंजाबराव देशमुख यांनी लावला. त्यांनी शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन तेथील जागा सुरक्षित केली. शहाजीराजांच्या समाधी स्थळाची २० गुंठे जागा पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. मात्र या समाधीच्या सुधारणेकडे महाराष्ट्र आणि मराठी नेत्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले आहे,।अशी खंत कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक मराठा महासंघाचे नेते मारुतीराव मुळे यांनी बोलताना व्यक्त केली.

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावला आलेल्या आमदार मारुती मुळे यांनी पत्रकारांशी बोलताना, शहाजीराजांचा दक्षिणेतील इतिहासाची सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवरायांचे बालपण बेंगळुरू येथे व्यतीत झाले. याच ठिकाणी शहाजीराजांनी बाल शिवाजींना स्वराज्य स्थापनेचा कानमंत्र दिला. कालांतराने शिवराय महाराष्ट्रात गेले. मात्र त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे आपले पिता शहाजी महाराजांसह दक्षिणेतच राहिले.
चन्नगिरी तालुक्यातील गोदेगेरी भागात जंगली श्वापदांचा त्रास वाढला होता. जंगली श्वापदांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे गोदेगेरीला गेले. त्यावेळी जंगलात त्यांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. त्या ठिकाणी पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारामुळे शहाजी महाराजांची समाधी बांधण्यात आली. शहाजी महाराजांचे थोरले चिरंजीव म्हणजेच छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांची कोप्पळ येथे समाधी आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या थोरल्या बंधूंच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या मुलाचे नाव संभाजी ठेवले होते. मात्र छत्रपती शिवरायांच्या थोरल्या बंधूंच्या स्मृती स्थळाची ही माहिती महाराष्ट्र महाराष्ट्रातील नेते तसेच समाजाला दिसून येत नाही. छत्रपती शिवरायांचा शेवटचा लष्करी तळ गदक जिल्ह्यातील श्रीमंत गडावर होता. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेचे प्रणेते शहाजीराजे यांचा खरा इतिहास जाणून घेण्याचे भान कुणालाच दिसत नाही याउलट केवळ महाराजांच्या नावाने जयघोष केला म्हणजे धन्य झालो असेच वातावरण दिसत आहे हे निश्चितच मराठा समाजाचे दुर्दैव आहे.

शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे महाराष्ट्र महाराष्ट्रातील नेते आणि मराठा समाजातील नेत्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचा कायापालट व्हावा. या ठिकाणी शिव स्वराज्य गौरव स्थळ बनावे. यासाठी मी गेली वीस वर्षांपासून कार्यरत आहे. शिवस्वराज्य गौरव स्थळाच्या विकासाचा आराखडा बनवून घेतला आहे. तो आराखडा कर्नाटक सरकारला सादर केल्यानंतर कर्नाटक सरकारने शहाजी महाराजांच्या स्मृतिस्थळासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही स्वतःहून निधी दिला आहे. शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, भैरोसिंग शेखावत, जे पी नड्डा, राजनाथ सिंग, प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,शरद पवार,सुप्रिया सुळे, भाजप नेते विनोद तावडे आदी मान्यवरांच्या भेट घेऊन त्यांना शहाजी महाराजांच्या स्मृति स्थळाची माहिती दिली. त्या स्मृतीस्थळाचा कायापालट करण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, आणि नागपूरच्या राजघराण्यांच्या भेट घेऊन त्यांनाही शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकानेच तेथे चांगले स्मृतीस्थळ निर्माण व्हावे याबाबत आश्वासन दिले मात्र त्या पलीकडे अद्यापही काहीही झालेले नाही.शहाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचा कायापालट व्हावा याबाबत कोणीही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही हे आम्हा मराठा समाजाचे दुर्दैव आहे अशी खंत ही मुळे यांनी बोलून दाखवली.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

Spread the love  बेळगाव : सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *