
बेळगाव : राज्य सरकारवर दलित आणि बहुजन समाजाच्या वतीने भीम आर्मी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भीम आर्मीचे राज्याध्यक्ष राजगोपाल यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषित केलेल्या ४२ हजार कोटी रुपयांच्या एससीपी/टीएसपी योजनेचा निधी दलितांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही, असा आरोप केला आहे.
सुवर्ण सौधसमोर आज भीम आर्मी संघटनेच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भीम आर्मीचे राज्याध्यक्ष राजगोपाल म्हणाले की, “मागील सरकारने एससीपी/टीएसपी योजना लागू केली, परंतु सिद्धरामय्या हे ४२ हजार कोटींची घोषणा करत फिरत आहेत, पण हा निधी आज आमच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. या ४२ हजार कोटींपैकी एका तालुक्याला आमच्या लोकांसाठी केवळ ५ कोटी रुपये देखील मिळत नाहीत. एका तालुक्यासाठी २०० कोटी रुपये येतात, तेही पोहोचत नाहीत. त्यामुळे आमच्या भीम आर्मी संघटनेने प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर देखरेख समिती स्थापन करावी. यामध्ये शिक्षित दलित सदस्य सामील होतील आणि प्रत्येक गोष्टीचा हिशेब विचारतील. आमच्या आणखी अनेक मागण्या आहेत, त्या सरकारने पूर्ण कराव्यात.” असे त्यांनी म्हटले.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी सांगितले की, “मागील सरकारने विधानसभेत वीर सावरकर यांचा फोटो लावून अनेक लाखो बहुजन लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्याच पद्धतीने हजरत टिपू सुलतान यांचा फोटो सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये पूजला जावा आणि बेळगाव येथील सुवर्णसौधमध्ये लावण्याचे काम सरकारने करावे. अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू.” असा इशारा त्यांनी दिला.
संघटनांच्या एका नेत्याने बोलताना सांगितले की, “आम्ही नेहमी दलित, मुस्लिम आणि बहुजनांच्या बाजूने आहोत, असे म्हणणाऱ्या सिद्धरामय्यांनी, आम्ही इतके लोक येथे बसून आंदोलन करत असताना, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, हे विचारण्यासाठी यायला नको का? त्यांनी यावे आणि विचारणा करावी. आमच्या महिलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका घ्यावी. टिपू सुलतानबद्दल बोलायचे असेल, तर आधी त्यांच्याबद्दल माहिती घेऊन बोला.” अशा शब्दांत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta