
बेळगाव : हलगा – मच्छे बायपासच्या कामाविरोधात शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच भूसंपादन आणि अनधिकृत बांधकाम सुरू केल्याबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बायपास करण्याचा निर्णय घेतल्यापासून या भागातील शेतकरी सातत्याने कामाला विरोध करत आहेत. मात्र, खोटी माहिती देऊन आणि चुकीच्या पद्धतीने भूसंपादन करून बायपासचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे वडगाव भागातील शेतकरी सुभाष लाड यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या रस्त्याचे काम बंद करण्याची सूचना करावी, अशी मागणी केली आहे. बायपासचे काम सुरू केलेल्या परिसरातील जमीन अत्यंत सुपीक आहे. तसेच भात, भाजीपाला आणि इतर पिकांची लागवड अनेक शेतकरी वर्षानुवर्षे करत आहेत. परंतु, बायपासचे काम हाती घेतल्यामुळे या भागातून होणारा पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने अनेक पिकांना फटका बसत आहे. या परिसरातील हलगा, जुने बेळगाव, मच्छे, धामणे, वडगाव, अनगोळ आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा
सुपीक जमिनीतून बायपास करू नये, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने निर्णय देताना झीरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय काम सुरू करू नये, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगाने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बायपास रस्त्याची संबंधित सर्व कागदपत्रे, अधिसूचना आणि कामाला सुरुवात करण्यासाठी दिलेला आदेश याची माहिती उघड करण्याचे निर्देश महामार्ग प्राधिकरणाला द्यावेत, भूसंपादन आणि अनधिकृत बांधकाम सुरू केल्याबाबत चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, न्यायालयाच्या आदेशाचे महामार्ग प्राधिकरणाने काटेकोरपणे पालन करावे, याबाबत सूचना करावी, आदी मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta