
बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उचगाव येथे १८ जानेवारीला हे संमेलन होणार आहे.
उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी ही माहिती दिली. संमेलनाच्या तयारीला वेग आला असून कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. संमेलनाच्या आयोजनामध्ये कोणतीही कसर राहू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी निधी, स्वागत मंडप, सजावट व अन्य व्यवस्था, ग्रंथदिंडी, सांस्कृतिक, आरोग्य माहिती व प्रसारण, भोजन आदी समित्यांची रचना करण्यात आली आहे. सर्व समित्या, समित्यांचे पदाधिकारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत.
ग्रंथदिंडीसाठी वारकरी, भजनी मंडळ, लेझीम पथक, झांजपथक, ढोल ताशा पथक यांना निमंत्रण देण्यात आले असून त्यांची तयारी सुरू केली आहे.
या संमेलनासाठी भव्य शामियान्याची उभारणी करण्यासंदर्भातही चर्चा केली असून बेळगाव-वेंगुर्ले रोडवरील अप्रोच रोडपासून ते संमेलन स्थळापर्यंत स्वागत कमानीसह सभामंडप उभारला जाणार आहे. गावातील प्राथमिक मराठी शाळा, मळेकरणी हायस्कूल, स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta