

बेळगाव : बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोग्य विभागाच्या नवीन फिरत्या आरोग्य पथकांना हिरवा झेंडा दाखवून आरोग्य संचारी योजनेचा शुभारंभ केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आणि रस्ते नसलेल्या गावातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
एकूण ८१ वाहनांच्या माध्यमातून ही सेवा संपूर्ण राज्यात दिली जाणार असून यामध्ये उत्तर कर्नाटकाला ४१ आणि दक्षिण कर्नाटकाला ४० वाहने देण्यात आली आहेत. या प्रसंगी आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी प्रास्ताविक केले. राज्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी ही योजना आखली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेचे लोकार्पण करताना मला मनापासून आनंद होत असून ज्यांना आजवर आरोग्य सेवा मिळत नव्हती, अशा सर्व लोकांपर्यंत आता सरकार पोहचणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले. आरोग्यापासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा देणे हेच आमच्या सरकारचे मुख्य ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. विशेषतः गरीब, वनवासी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या बांधवांना वेळेवर उपचार मिळावेत तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहावे हीच आमची सदिच्छा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संकल्प बोलून दाखवला.


Belgaum Varta Belgaum Varta