Monday , December 22 2025
Breaking News

गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावर भारत विकसित व शक्तिशाली राष्ट्र : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Spread the love

 

बेळगाव : भारताला लाभलेल्या प्राचीन व गौरवशाली शिक्षण परंपरेच्या बळावरच आज देश विकसित आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पातळीवर पुढे येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले.

कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी खासदार व केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, साहित्यिक बसवराज जगजंपी, शाळेचे माजी विद्यार्थी जयंत देशपांडे तसेच माजी आमदार संजय पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री जोशी पुढे म्हणाले की, ब्रिटिशांनी देशावर गुलामगिरी लादताना भारतीयांच्या मनात न्यूनगंड निर्माण केला. भारताची ओळख गरीब व अज्ञानी अशी बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही ओळख पुसली जात असून, भारतीयांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्याचे कार्य सुरू आहे. भारताला आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, चरक व सुश्रुत यांसारख्या महान विद्वानांची परंपरा लाभली आहे. ऋषीमुनींच्या ज्ञानामुळे भारताने जगाला मानवतेचे धडे दिले, असे त्यांनी नमूद केले.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणतेही ‘केसरीकरण’ नसून, त्यामध्ये भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचे प्रतिबिंब दिसून येईल. याच ज्ञानशक्तीच्या आधारावर भारत आज जगातील चौथी आर्थिक शक्ती बनला आहे, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले की, ब्रिटिश काळात बेळगाव हे प्रशासकीय मुख्यालय असल्याने येथे अनेक मिशनरी शाळा सुरू होत्या. त्या काळात शिक्षण देणे व घेणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत ध्येयवादी शिक्षक आणि दानशूर व्यक्तींनी सुरू केलेल्या शाळांपैकी बी. के. मॉडेल हायस्कूलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे.

कार्यक्रमात बसवराज जगजंपी यांनीही आपले विचार मांडले. या शताब्दी सोहळ्यासाठी शाळेचे आजी-माजी विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गणेशपूर येथे विहिरीमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; एचईआरएफ टीमचे सहकार्य

Spread the love    बेळगाव : गणेशपूर बेळगाव येथील रहिवासी अलका बसवंत पाटील (वय 52 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *