
बेळगाव : १४ व्या कॅपिटल वन करंडक एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगावात अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. या स्पर्धेच्या खुल्या गटात कोल्हापूरच्या डी.आर.के.सी. कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ‘ग्वाही’ एकांकिकेने, तर शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हा मर्यादित गटात वरेरकर नाट्य संघ बेळगावच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली.
यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्हाईस चेअरमन शाम सुतार आणि परीक्षक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना परीक्षक प्रमोद काळे यांनी बदलत्या काळानुसार एकांकिकेमध्ये होणारे बदल आणि तांत्रिक खबरदारी यावर मार्गदर्शन केले. सहभागी संघांच्या सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त करतानाच, स्पर्धक संघांनी परीक्षक मंडळाशी चर्चा करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला बेळगावातील अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी भेट देऊन सादरीकरणाची प्रशंसा केली. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी कॅपिटल वन संस्थेच्या सांस्कृतिक सातत्याचे कौतुक केले. या सोहळ्याला संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, शरद पाटील, भाग्यश्री जाधव, लक्ष्मीकांत जाधव, नंदा कांबळे तसेच सुभाष सुंठणकर, निळूभाऊ नार्वेकर आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला
सांघिक गटात वरेरकर नाट्य संघाने ‘झाले मोकळे आभाळ’साठी प्रथम, आर्यन्स फन स्कूलने ‘पक्षांचे कवी संमेलन’साठी द्वितीय तर रंगभूमी ग्रुपने ‘खरवस’साठी तृतीय पारितोषिक मिळवले. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन प्रिया काळे (आर्यन्स फन स्कूल), उत्कृष्ट अभिनेता शिवम शहापूरकर (वरेरकर नाट्य संघ) आणि उत्कृष्ट अभिनेत्री स्पृहा गोखले (रंगभूमी ग्रुप) यांनी पटकावले. तांत्रिक विभागात नेपथ्यासाठी दिनेश कणबरकर, पार्श्वसंगीतासाठी कोमल रहाणे, प्रकाशयोजनेसाठी अमृता काळे आणि वेशभूषा-रंगभूषेसाठी प्रिया काळे व अक्षया पाटील यांना गौरविण्यात आले.
याव्यतिरिक्त अंशुमन विचारे, साईराज गुरव, वेदांत वीर, हर्षाली पुजारी, सायली भोसले, भावना मराठे, सानवी तुळपुळे आणि आरती आपटे यांनी विविध गटात उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. तसेच परिवर्तनाचा वाटसरू या एकांकिकेतील कलाकारांना परीक्षकांच्या शिफारसीनुसार विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta