
बेळगाव : हलगा येथील अल्पभूधारक शेतकरी नागेंद्र मऱ्याक्काचे हे सरकारच्या बेजबाबदारपणाचे बळी ठरले असून त्यांच्यावर चारही बाजूने सुलतानी संकट ओढावले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हलगा गावचे शेतकरी नागेंद्र मऱ्याक्काचे यांची पिकावू जमीन बेकायदेशीर बायपास रस्त्यात जाणार असल्याचे समजले तेव्हापासून नागेंद्र यांचे मानसिक संतुलन बिघडले. 2019 पासून ते विमनस्क अवस्थेत फिरत असतात. शेताकडे जातो असे सांगून दुसऱ्याच्या शेतात काम करत असतात किंवा आपल्या शेताच्या जागी जाऊन बडबडत बसतात. मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यात ते कुणालाही न सांगता घराबाहेर पडले. घरच्या मंडळींनी बरीच शोधाशोध केली असता बस्तवाड शिवारात चिखलात निपचित होऊन पडले होते. बस्तवाड भागातील शेतकऱ्यांना त्यांची ओळख पटल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळविले आणि नागेंद्र यांचे प्राण वाचले. तेव्हापासून ते न सांगता अचानक घरातून बाहेर जात असतात त्यामुळे कुटुंबीयांना त्यांच्यावर सतत पाळत ठेवून राहावे लागत आहे. त्यातच भरीसभर म्हणून की काय त्यांच्या दुसऱ्या एका शेतात अलीकडेच हेस्कॉम विभागाने उच्चदाबाच्या वाहिन्या घालण्यासाठी भलेमोठे खड्डे काढून खांब उभारणीसाठी बारसहित काँक्रिटीकरण केले आहे, ज्यामुळे त्यांची उरलीसुरली सुपीक जमीन देखील सरकारच्या या धोरणामुळे त्यांच्या हातातून गेली आहे. एकीकडे बायपास तर दुसरीकडे हेस्कॉम विभागाच्या गलथान कारभारामुळे सदर कुटुंबीयांवर कंगाल होण्याची परिस्थिती उद्भवली आहे. दोन्ही कडील पीकाऊ सुपीक जमीन हातातून गेल्यामुळे या कुटुंबीयांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की, आमचे सरकार अन्नदात्यांवर कधीच अन्याय करणार नाही पण बेळगावमधील सुवर्णसौध समोरील हलगा गावच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत आहे त्या कुटुंबीयांची जमीन बायपास रस्त्यात गेल्यास या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात येणार आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना जगवायचे सोडून त्यांना भूमिहीन करण्याचे धोरण अवलंबत आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. वास्तविक पाहता अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची सरकारने विचारणा करणे गरजेचे आहे. परंतु सरकार विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संपविण्याचे षडयंत्र रचत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील भाजप सरकारने देखील विकासाच्या नावाखाली या भागातील शेतकऱ्यांना कंगाल करण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला होता आणि त्याच सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून सध्याचे काँग्रेस सरकार देखील शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणाऱ्या सिद्धरामय्या सरकारने जागरूकपणे बेकायदेशीर कामांची पडताळणी करून तात्काळ ती बेकायदेशीर कामे रद्दबातल करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हलगा, मच्छे या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta