Wednesday , March 4 2026
Breaking News

मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या इनामदार साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण आठ कामगार गंभीर भाजले गेले होते. त्यापैकी अक्षय तोपडे, दीपक मन्नोळी आणि सुदर्शन या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींवर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने तात्काळ हालचाली केल्या. पोलिसांनी झिरो ट्रॅफिक करून जखमी कामगारांना तातडीने केएलई रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार मिळू शकले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रारंभिक तपासात काम सुरू असताना सुरक्षा उपायांतील त्रुटीमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जखमी कामगारांमध्ये मंजुनाथ तेरदाळ, राघवेंद्र गिरीयाळ, गुरु तम्मण्णवर, भरत सारवाडी आणि मंजुनाथ काजगार यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कारखान्यातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास मुरगोड पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *