बेळगाव : सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील 17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथे 1956 च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्या पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा त्याचप्रमाणे युवा समिती सीमाभाग आयोजित “मराठी सन्मान यात्रे”ला पाठिंबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आगामी कन्नडसक्तीच्या महामोर्चामध्ये उपस्थित राहण्याचा निर्धार करणारा ठराव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 17 जानेवारी हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खानापूर रोड रेल्वे ओवर ब्रिज येथील मराठा मंदिरात तालुका समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर होते. बैठकीचे प्रास्ताविक आणि बैठकीचा उद्देश एम. जी. पाटील यांनी स्पष्ट केला. सुरुवातीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किनेकर यांनी 17 जानेवारी 1956 साली झालेल्या आंदोलनाचा इतिहास कार्यकर्त्यांसमोर मांडला. सीमा प्रश्न न्यायालयात असला तरी रस्त्यावरची लढाई देखील तितकीच महत्त्वाची असून ती चालू ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या 17 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता कंग्राळी खुर्द येथे आयोजित हुतात्मा अभिवादनास तालुका समिती पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
बैठकीदरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या डांबर मोर्चामध्ये बहुसंख्येने सहभाग नोंदविणे आणि तसेच युवा समिती सीमाभाग आयोजित “मराठी सन्मान यात्रे”ला पाठिंबा देण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. बैठकीदरम्यान आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, दिपक पावशे, लक्ष्मण होणगेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला तालुका समिती पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta