



सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली; ऍड. राजाभाऊ पाटील
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज 17 जानेवारी रोजी शहरातील हुतात्मा चौक येथे मराठी भाषिकांच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, बेळगाव- कारवार -निपाणी, बिदर -भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणा देत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला प्रास्ताविक झाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेतर्फे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तज्ञ समिती सदस्य राजाभाऊ पाटील आणि शहर समितीचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते बी. ओ. येतोजी यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, विद्यमान नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, अंकुश केसरकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, आप्पासाहेब गुरव, मदन बामणे, ऍड. महेश बिर्जे, माजी उपमहापौर धनराज गवळी, महेश जुवेकर, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, किरण हुद्दार, उमेश पाटील, सतीश पाटील, दत्ता उघाडे, यांच्यासह समिती कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शहरातील प्रमुख गल्ल्यातून मुकफेरी काढण्यात आली. हुतात्मा चौकातून फेरीला सुरुवात झाली. रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौक येथे येऊन मुकफेरीची सांगता झाली. त्यानंतर हुतात्मा चौक येथे सभा घेण्यात आली. सभेत बोलताना ऍड. राजाभाऊ पाटील म्हणाले की, भाषावार प्रांतरचना झाली आणि मराठी बहुल भाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती आजपर्यंत हा लढा देत आहे. जोपर्यंत सीमा भाग महाराष्ट्रात विलीन होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. या लढ्यात प्राण्यांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना स्मरण करून हा लढा पूर्णत्वाला नेण्यासाठी शपथबद्ध होण्याकरिता आपण 17 जानेवारी हा हुतात्मा दिन शोक दिन म्हणून पाळत आलो आहोत. सीमा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात आला आहे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा भारताच्या संसदेकडे पाठवावा आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. परंतु आजतागायत या मागणीचा विचार केंद्र सरकारने केलेला नाही. आपली मागणी मान्य होईपर्यंत हा लढा अविरत चालू ठेवावा लागेल. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक मागील 70 वर्षांपासून हा लढा लढत आहेत. सीमा प्रश्न सोडवून घेऊन सीमा भाग महाराष्ट्रात विलीन करणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली असेल. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत आपली महाराष्ट्रात विलीन होण्याची इच्छाशक्ती दाखवून दिली.
Belgaum Varta Belgaum Varta