Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव शहरात ठराविक वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Spread the love

 

बेळगाव : वाढते अपघात व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बेळगावात ठरावीक वेळेपुरता अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
शहरात रोज सकाळी 7 ते 11 व दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. काँग्रेस रोड व गोवावेस परिसरातील काही भीषण अपघातांनंतर यापूर्वीही प्रशासनाने ठरावीक वेळेपुरता शहरात प्रवेशबंदी जारी केली होती. नंतर त्यात विस्कळीतपणा आला होता. सकाळी शाळकरी मुले, कामगार, सरकारी अधिकाऱ्यांचा संचार अधिक असतो. त्यामुळे अपघातात बळींची संख्याही वाढते आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वर्दळीच्यावेळी अवजड वाहनांना प्रवेशबंदी जारी करण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. नो एंट्रीत शिरणाऱ्या 1001 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून गेल्यावर्षी 4 लाख 17 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. आरटीओ सर्कलपासून मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत व कीर्ती हॉटेलपासून आरटीओ सर्कलपर्यंत नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे. कोल्हापूर सर्कलपासून महानगरपालिका कार्यालयापर्यंत सम-विषम पार्किंग असणार आहे. यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

खासगी बसेससाठी पिकअप पॉईंट ठरविले आहेत. आरटीओ सर्कल, त्रिवेणी हॉटेल, रामदेव हॉटेल, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणच्या पिकअप पॉईंटमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन भरतेश स्कूल (पे पार्किंग), अशोकनगर येथील बेळगाव वनजवळील पे पार्किंग व धर्मनाथ सर्कलपासून अशोकनगरपर्यंतच्या रस्त्यावर तीन ठिकाणी पिकअप पॉईंटसाठी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. खासगी बसचालक-मालकांनी या सूचनेचे पालन करावे. नहून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *