स्वेटर, कानटोप्यांचे वितरण : वैद्यकीय अधीक्षकांसह मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने जिल्हा रुग्णालयातील गर्भवती व बाळंतीण महिलांना उबदार कपड्यांचे वितरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून बीम्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इराण्णा पल्लेद उपस्थित होते. व्यासपीठावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजिनी तिगडी, जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच झाला असून नूतन अध्यक्ष म्हणून लक्ष्मण शिंदे यांनी सूत्रे घेतली आहेत. ते अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा पहिलाच प्रकल्प येथील जिल्हा रुग्णालयातील गरीब बाळंतीण महिलांसाठी घेण्यात आला. सध्या थंडी वाढत असून या थंडीचा सामना करणे सर्वसामान्यांनाही अवघड बनत चालले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या तसेच बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलांना उबदार कपडे देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार रुग्णालयातील 20 बाळंतिणींना स्वेटर व कानटोप्यांचे वितरण करण्यात आले. जायंट्सचे सदस्य प्रेमानंद गुरव यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाच्या खर्चाचा भार उचलला. त्यांच्या अनुपस्थितीत चिरंजीव प्रतीक गुरव यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग दर्शविला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लेद म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातून दररोज शेकडो रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असतात. गरिबीमुळे त्यांना काही ना काही मदतीची गरज असते. जायंट्सने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. जायंट्स मेनच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. जायंट्सचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, जिल्ह्यातून येणाऱ्या गरीब महिलांसाठी उबदार कपडे मिळावेत या हेतूने हा उपक्रम राबवला आहे. गरीब व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी जायंट्स मेन ही सामाजिक संस्था नेहमीच पुढाकार घेत असते असे त्यांनी सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोजिनी तिगडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिव विश्वास पवार, आकाश लाटुकर, प्रशांत मेलगे, राहूल बेलवलकर, फेडरेशन ऑफीसर सुनिल मुतगेकर व संजय पाटील, अरुण काळे, उमेश पाटील, विजय बन्सूर, आनंद कुलकर्णी, अविनाश पाटील, वाय. एन. पाटील, प्रकाश तांजी, अशोक हलगेकर, संजय सूर्यवंशी, मोहन पत्तार यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी व जायंट्सचे अन्य सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta