बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दरवर्षी बेळगावात रथयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 28 वे वर्ष आहे.
दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौकात हजारो स्त्री-पुरुष भक्त एकत्र आल्यानंतर इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, सुंदर चैतन्य महाराज, वृंदावन चे ब्रजेश चंद्र गोस्वामी प्रभू यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
फुलांनी सजविलेल्या रथामध्ये राधा कृष्ण, नित्यानंद महाप्रभू आणि गौरंग महाप्रभू यांचे आर्चविग्रह ठेवले होते. रथाचे पूजन व आरती केल्यानंतर खासदार इराण्णा कडाडी यांनी श्रीफळ वाढवून रथयात्रेस चालना दिली.
रथाला समोरच्या बाजूला दोन्ही कडेने दोरखंड बांधण्यात आले होते. डावीकडून पुरुष आणि उजवीकडून महिला रथ ओढीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta