रायगड (नरेश पाटील) : बेळगाव सीमाभागातून “मराठी सन्मान यात्रे”च्या निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी व सुमारे २५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्ते रविवारी सायंकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड (ता. महाड) येथील धर्मशाळेत दाखल झाले.
सीमा भागातील विविध ठिकाणांहून हे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले असून आणखी काही कार्यकर्ते वाटेत असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली. सदर माहिती बेळगाव वार्ताचे रायगड प्रतिनिधी तथा मूळचे बेळगाव येथील आणि सध्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे वास्तव्यास असलेले वृत्तपत्रकार नरेश पाटील यांच्याशी संवाद साधताना दिली.
दरम्यान, पाचाड येथील धर्मशाळेत सायंकाळी उशिरा सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा भजन कार्यक्रम येळ्ळूर येथील वारकरी संप्रदायाने सादर केला.
सीमा भागातील मराठी अस्मितेचा बुलंद आवाज यावेळी घोषणांतून उमटताना दिसून आला.
येळ्ळूर येथील युवा वर्गाने हलगी पथकाच्या वादनाने कार्यक्रमात जोश आणि उत्साह निर्माण केला. हलगीच्या निनादात संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या यात्रेसाठी आलेल्या युवा समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवास व अन्य आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था पाचाड येथील सरपंच यांनी केली.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थिती न दर्शवता या उपक्रमाला पाठिंबा दिला असल्याचे सांगण्यात आले.
भजन कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर पुन्हा हलगी पथकाचे वादन करण्यात आले. त्यानंतर शुभम शेळके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा स्पष्ट करत सोमवारी पहाटे ठीक ४ वाजता रायगड किल्ल्यावरील होळीच्या मैदानात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जमावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच सर्वांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
Belgaum Varta Belgaum Varta