Tuesday , March 3 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी; प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्ष

Spread the love

 

बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठातील निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.

कवीवर्य नारायण सुर्वे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त त्यांचे काव्यलेखन व कार्य तसेच गेल्या अकरा वर्षांपासून राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर अनेक अंगांनी हल्ले होत असून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी लेखकांचीही आहे. म्हणून लोकशाहीवर होणारे हल्ले व लेखकांची जबाबदारी ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. संमेलनाचे उद्घाटन प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव व लेखक डॉ. सुखदेवसिंग सिरसा, चंदिगड यांच्या हस्ते होणार आहे.

चार सत्रात हे संमेलन होणार आहे. सकाळी दहा वाजता पहिल्या सत्रात उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये उद्घाटक व अध्यक्ष यांची भाषणे होतील. साडेबारा वाजता दुसरे सत्र होईल. त्यामध्ये अन्नपूर्णा महिला मंडळातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न कॉम्रेड अरुणा असफ आली पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार मुंबईतील सफाई कामगारांचे नेते कॉ. दीपक भालेराव यांना अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत भोजन होईल. त्यानंतरच्या तिसऱ्या सत्रात विशेष व्याख्यान होईल. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांचे “नारायण सुर्वे यांचे काव्यविश्व” या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे राहाणार आहेत.
चौथ्या सत्रात सायंकाळी पाच वाजता प्रगतिशील लेखक संघाच्या सदस्यांकडून नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन होणार आहे. संकल्पना व संहिता लेखन कॉ. अनिल आजगावकर यांचे आहे. या कार्यक्रमात प्रा. अशोक अलगोंडी, निला आपटे, मधु पाटील व रोशनी हुंद्रे यांचा सहभाग राहाणार आहे.
अध्यक्षीय समारोपानंतर संमेलनाची सांगता होणार आहे.

कवीवर्य पद्मश्री कॉ. नारायण सुर्वे साहित्यनगरी, श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल प्रांगण) रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, खानापूर रोड, बेळगांव येथे हे संमेलन होणार आहे.

बैठकीस पदाधिकारी व बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *