Tuesday , March 3 2026
Breaking News

लॉरी चालकावरील चाकू हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : किरकोळ कारणावरून लॉरी चालकावर चाकूने हल्ला करून दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या धडाकेबाज कारवाईची माहिती दिली असून आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. बेळगावमधील बी. शंकरानंद मूर्ती चौकाजवळ ही घटना घडली होती. कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉरी चालक शिनोळीहून बेळगावकडे येत असताना सोनवालकर वाईन्स जवळील स्पीड ब्रेकरवर त्याने अचानक ब्रेक लावला. या आवाजामुळे संतापलेल्या तीन स्कुटीस्वारांनी ‘आम्हाला मारणार का?’ असे म्हणत लॉरी चालक अयाज अहमद सवणूर याच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी लॉरीचा पाठलाग करून बी. शंकरानंद मूर्ती चौकाजवळ दगडफेक केली. याच गोंधळात आरोपींची स्कुटी एका कारला धडकली, ज्यामुळे संतापलेल्या अथर्व गुंडू उसूलकर, प्रशांत, नागेश डांगे आणि नीलकंठ मुरगुड या चौघांनी लॉरी चालकावर चाकूने सपासप वार केले, अशी माहिती भूषण बोरसे यांनी दिली. या घटनेनंतर कॅम्प पोलीस निरीक्षक आनंद आणि सीसीबी पोलीस निरीक्षक नंदीश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २४ तासांच्या आत आरोपींना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. शहरात किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करण्याच्या घटना वाढत असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष ‘चाकू विरोधी’ पथक स्थापन करण्यात आले आहे, असे भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.

या यशस्वी कारवाईत पीआय श्री. आनंद एम. वनकुंद्री, पीएसआय श्रीमती ई. रुक्मिणी, तसेच पोलीस कर्मचारी बसवराज उज्जिनकोप्पा, वाय. एम. मुनवळी, बी. ए. करिगार, जे. एस. लमाणी, एन. एम. तेली, एम. बी. हडगिनाळ, सी. जे. नायक, प्रकाश एस. सनमणी यांचा सहभाग होता. या संपूर्ण कारवाईचे पोलीस आयुक्त बेळगाव शहर व डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *