
बेळगाव : आंबेवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री. संभाजी भिडे गुरूजी यांच्या पवित्र हस्ते विधीवत पार पडली. मंत्रोच्चार, वैदिक विधी आणि भक्तिभावाने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. या भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याला माजी आमदार श्री. संजय पाटील, माजी आमदार श्री. मनोहर किणेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष (हिंडलगा) श्री. नागेश मुन्नोळकर, युवा नेते महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. आर. एम. चौगुले (मण्णूर), चेतन पाटील (माजी ग्रामपंचायत अध्यक्ष), किरण गावडे (शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान) तसेच परशराम कोकीतकर (जिल्हा प्रमुख, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान) यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याचा गौरव अधिकच वाढला.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडली. ढोल-ताशांच्या निनादात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या गजरात संपूर्ण आंबेवाडी गाव शिवमय झाले. ही प्रतिष्ठापना केवळ मूर्ती उभारणी नसून, शिवविचार, स्वराज्याची ज्वाला आणि पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करणारा ऐतिहासिक क्षण ठरला.
संध्याकाळी पार पडलेल्या मुख्य कार्यक्रमास कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा. श्रीमती लक्ष्मीताई हेब्बाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह ग्रामपंचायत आंबेवाडीचे उपाध्यक्ष श्री. आनंद तुडयेकर, उद्योजक भूजंग ढोपे, सुनील राक्षे, रमेश रेडेकर, सौ. माधुरी तेरसे, जयवंत बाळेकुंद्री, तानाजी अतिवाडकर, विनायक काटकर, लक्ष्मी यळगुकर, योगेश राक्षे, बाळासाहेब धामणकर, मारुती तरळे, बाळू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संध्याकाळचा कार्यक्रम अधिकच दिमाखदार झाला.
कार्यक्रमात बोलताना माननीय लक्ष्मीताई हेब्बाळकर म्हणाल्या,
“छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझा श्वास आहेत. त्यांच्या विचारांवर चालत विकासाची कामे करणे हेच माझे ध्येय आहे. या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी दिलेली देणगी ही माझी नसून, महाराजांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे.”
त्यांच्या या भावनिक शब्दांनी उपस्थित शिवभक्त भारावून गेले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील, प्राचार्य म म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांनी शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिवाजी अतिवाडकर होते. तर मूर्ती प्रतिष्ठापना संकल्प समितीचे चेअरमन संजय तरळे यांनी संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाची भूमिका बजावली. देणगीदार, सहकार्य करणारे हात आणि सेवाभावी वृत्तीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव अतिवाडकर व चेअरमन संजय तरळे यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमादरम्यान लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी तुळशीपत्रे व फुलांचे हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. संपूर्ण वातावरणात धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीची ऊर्जा दरवळत होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामूहिक जयघोष करत शिवछत्रपतींच्या विचारांची ज्योत अखंड प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प केला.
या ऐतिहासिक शिवप्रतिष्ठापनेसाठी अखंड परिश्रम घेणारे कार्यकर्तेच या सोहळ्याची खरी ताकद ठरले. या कार्यात नागराज चौगुले, अरविंद भांदुर्गे, महादेव राक्षे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच अध्यक्ष संजय तरळे, रमेश राक्षे, मदन शहापुरकर, महादेव पाटील, संदीप तरळे, नागेश तरळे, विनायक तरळे, दामोदर तरळे, सुनील ढोपे, दीपक चोपडे, संजय रवळोजी, अशोक कोचेरी, उमेश बेळगुंदकर, अशोक मन्नोळकर, उत्तम तरळे, राजू तरळे, कपिल तरळे, निखिल गडकरी, सुधीर शहापुरकर, प्रशांत कातकर, अनिल तरळे, गोपाळ तरळे, किरण पाटील, प्रल्हाद तरळे, रोहित तरळे यांनी अथक परिश्रम घेत हा सोहळा यशस्वी केला.
ही शिवप्रतिष्ठापना आंबेवाडीच्या इतिहासातील अभिमानाचा सुवर्णक्षण ठरली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार आणि स्वराज्याची प्रेरणा पिढ्यान्पिढ्या जिवंत ठेवणारी ठरणार आहे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta