
बेळगाव : गो-गो स्पोर्ट्स बेळगाव आयोजित आणि भाजप नेते ॲड. मुर्गेंद्रगौडा पाटील पुरस्कृत ‘मुर्गेंद्रगौडा करंडक -2026’ या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह आकर्षक करंडक व 51,000 रुपयांचे बक्षीस श्रीराम सेना हिंदुस्थान, अनगोळ संघाने हस्तगत केले. यजमान गो-गो स्पोर्ट्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बेळगाव शहरातील महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानामध्ये सदर हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतीच उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ आणि गो-गो स्पोर्ट्स यांच्यातील स्पर्धेचा अंतिम सामना मर्यादित 6 षटकांचा खेळविण्यात आला. गो-गो स्पोर्ट्स बेळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना श्रीराम सेना (एस.आर.एस.) हिंदुस्थान अनगोळ संघाने मर्यादित 6 षटकामध्ये 4 गडी बाद 62 धावा जमविल्या. या धावांचा पाठलाग करत असताना गो-गो स्पोर्ट्स बेळगाव संघाला 6 षटकात 3 गडी बाद 33 धावाच जमवता आल्या. या पद्धतीने श्रीराम सेना हिंदुस्थान संघाने 29 धावाने सामना जिंकून विजेतेपदाच्या करंडकावर आपले नांव कोरले. यावेळी त्यांच्या खेळाडूंसह समर्थकांनी एकच जल्लोष करून मैदानावर आनंदोत्सव साजरा केला.
अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी एस.आर.एस. हिंदुस्थान संघाचा अक्षय जितकर हा ठरला. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अनुक्रमे अलरजा गांधीनगर संघाचा अमीर व गो-गो स्पोर्ट्स बेळगावचा सोमनाथ यांची निवड करण्यात आली. मालिकावीर किताब देखील एस.आर.एस. हिंदुस्थान संघाच्या अक्षय जितकर यानेच पटकावला. त्याला बक्षिसा दाखल रेंजर सायकल देण्यात आली. स्पर्धेचा अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभास पाहुणे म्हणून स्पर्धेचे पुरस्कर्ते ॲड. मुर्गेंद्रगौडा पाटील, राहुल मुचंडी, जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक पारितोषिके वितरित करण्याबरोबरच विजेत्या श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाला 51,000 रुपये व आकर्षक करंडक देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे उपविजेत्या गो-गो स्पोर्ट्स बेळगाव संघाला चषकासह 25,000 रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मैदानावर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta