Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल : सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love

 

सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व बस्तवाड हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

बेळगाव (प्रतिनिधी) : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व मराठा मंडळचे बस्तवाड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसीचे अध्यक्ष शिवाजीराव काकतकर होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी “मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. गुण मिळविण्याबरोबरच गुणवंत होणे अधिक महत्त्वाचे आहे. ध्येय साध्य करण्यासाठी अखंड परिश्रम आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन केले. तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. शिल्पा पाटील व सौ. माया महेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नामवंत वकील आण्णासाहेब घोरपडे व श्री. शिवाजी काकतकर यांच्या हस्ते झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील, रामा मंगेश काकतकर, समीरभाई सनदी, तवन्नाप्पा बडीगेर, कॅप्टन पराराम काकतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक विजय खांडेकर यांनी केले. सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. वकील आण्णासाहेब घोरपडे व चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले.

सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका व विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उत्स्फूर्त कौतुक केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा व मराठा मंडळचे बस्तवाड हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार व कलेची जाणीव दृढ केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *