Friday , April 17 2026
Breaking News

“गुणांसह गुणवंत व्हा; संस्कार हा भक्कम जीवनाचा पाया!” : सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love

 

संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात

शिनोळी (प्रतिनिधी) : द.म.शि मंडळ संचलित संत तुकाराम विद्यालय सुंडी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवण्यापेक्षा गुणवंत व्यक्तिमत्त्व घडवण्याचा मोलाचा संदेश दिला.

आपल्या प्रेरणादायी भाषणात ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनो, दहावीची परीक्षा ही शेवट नसून तुमच्या भवितव्याची नवी सुरुवात आहे. गुण मिळवणे आवश्यक आहे; परंतु गुणांपेक्षा गुणवत्ता आणि गुणवत्तेपेक्षा संस्कार अधिक श्रेष्ठ आहेत. नियोजनबद्ध अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो. दररोज ठरावीक वेळ अभ्यास, नियमित उजळणी, प्रश्नपत्रिकांचा सराव आणि आत्मपरीक्षण-हीच यशाची गुरुकिल्ली आहे. कष्टांना पर्याय नाही; पण कष्ट नियोजनबद्ध असतील तर यश निश्चित असते.”

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष एन. एम. पाटील होते.

ते रवींद्र पाटील पुढे म्हणाले, “चांगले संस्कार हेच भक्कम जीवनाचा पाया आहेत. आई-वडिलांचा आदर, गुरुजनांविषयी कृतज्ञता, समाजाप्रती जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे. गुण तुम्हाला नोकरी देतील; पण संस्कार तुम्हाला मान-सन्मान देतील. ज्ञान तुम्हाला उंच नेईल; पण नम्रता तुम्हाला स्थिर ठेवेल.” त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, मोबाईलचा मर्यादित वापर, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास जपण्याचे आवाहन केले.

यावेळी झि. निं. पाटील गुरुजी, शंकर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ठाणे योगेश हन्नूरकर, दत्तात्रय देसाई तसेच निवृत्त लिपिक व्ही. एस. पाटील यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या .

यावेळी महात्मा फुले प्रतिमा पूजन रवींद्र पाटील यांनी केले तर दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष एन एम पाटील व मान्यवरांनी केले. मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा वळणबिंदू असल्याचे सांगून सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षक पी. एस. पाटील व मनोहर भुजबळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. दहावीच्या शिक्षकांनी आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांची कृतज्ञता
सन 2025–26 च्या एसएससी बॅचने शाळेला 20 प्लास्टिक खुर्च्यांची भेट देत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींच्या सहवासाचा भावनिक उल्लेख केला.

प्राजक्ता सुतार, अथर्व माडगूळकर, रामराज पाटील, रोशन मोर्ये व अक्षय पाटील यांनी मनोगते व्यक्त करताना, “या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर जीवनमूल्ये दिली,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. पाटील सर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन कुमारी एस. आय. नाईक मॅडम यांनी केले.

या सदिच्छा समारंभातून विद्यार्थ्यांना एकच प्रेरणादायी संदेश मिळाला – गुणांसह गुणवंत व्हा आणि संस्कारांची शिदोरी आयुष्यभर जपा!

About Belgaum Varta

Check Also

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

Spread the love  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *