वेदांत सखी ग्रुपच्या महिला दिन कार्यक्रमात अनुजा रजपुत यांचे प्रतिपादन
बेळगाव : आपल्या कुटुंबासाठी सर्व स्त्रिया कष्ट घेत असतात. कौटुंबिक कामाबरोबरच छंदही जोपासतात. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची भावना बरेच काही चांगले कार्य करून जात असते. अशाच इच्छेतून मी समुद्रसपाटीपासून 5864 मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर झालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे, असे प्रतिपादन अनुजा रजपूत यांनी वेदांत सखी ग्रुप वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला दिन कार्यक्रमात बोलताना केले.
भारत नगर येथील वेदांत सखी ग्रुप वतीने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनुजा रजपुत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदांत सखीच्या अध्यक्ष सविता सायनेकर उपस्थित होत्या. वेदांत सोसायटीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनुजा रजपूत यांनी बर्फाळ प्रदेशातील गिर्यारोहणाचे अनेक कटू गोड अनुभव सांगितले. त्याचबरोबर बेळगाव परिसरातील ज्यांना गिर्यारोहण करायचे असेल त्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी यमुना हलगेकर यांच्या हस्ते अनुजा रजपूत यांचा शाल, रोप व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात पाटील नर्सिंग होमच्या परिचारिका ममता हिरुगडे व चिन्मय हॉस्पिटल खासबाग येथील परिचारिका कुमारी नयन भातकांडे यांचा, सुमन सुळेभावी व नलिनी खन्नुकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दोन्ही परिचारिकांनी आपल्या वैद्यकीय सेवेतील अनुभव यावेळी कथन केले. वेदांत सोसायटीचे सल्लागार जे.वए. खन्नुकर व पी. एन. सुळेभावी यांनी यावेळी समयोचित विचार मांडले. सविता सायनेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महिलांनी स्वयम स्फूर्तीतुन जीवनात प्रगतीची दिशा गाठावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लक्ष्मी सैनुचे व स्नेहल खन्नूकर यांनी स्वागतगीत सादर केले. पल्लवी सायनेकर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. लक्ष्मी सैनुचे यांनी आभार प्रदर्शन केले. वेदांत सखी वतीने किल्ला तलाव रस्त्या शेजारील गरीब मजुरांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाला वेदांत सोसायटीचे संचालक, कर्मचारी तसेच वेदांत सखीच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.