तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यात काजू खरेदी व्यापाऱ्याकडून काजू दर कमी करून लुबाडणूक चालू आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास पुढील काही दिवसात काजूला अधिक दर मिळेल असा विश्वास एम. के. पाटील यांनी व्यक्त केला.
ते पुढे बोलताना म्हणाले, यावर्षीची एकूण परिस्थिती पाहता सध्याला काजूला असणारा 105 ते 120 रुपये दरम्यान असणारा काजू दर हा अत्यंत कमी आहे. आपला लढा हा 160 रुपये प्रति किलो पेक्षा अधिक दर घेण्यासाठी आहे. आपली मागणी 170 रुपये प्रतिकिलोची आहे. यावर्षी अत्यंत कमी असलेले उत्पादन व काजू गराचा दर पाहता ती मागणी रास्तच आहे. आत्ता जरी उद्योग काही प्रमाणात बंद असले तरी ठराविक काळानंतर काजू गराला मागणी प्रचंड असणार आहे. शिवाय काजू गराचा दरही सद्य परिस्थितीत चांगलाच आहे. कोणीही गडबडून जाऊ नका. माल मिळेना म्हटल्यावर आत्ता खरेदीदार गल्लोगल्ली फिरत आहेत. पूर्वी ते एकजागे बसुन काजू गोळा करायचे, आत्ता रस्त्यावर उतरले आहेत. आपण फक्त संयम राखायचा आहे. ज्यांनी अजुन काजू वाळवली नाही त्यांनी काजू वाळवून घ्या कारण अवकाळी पाऊस, वादळ यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना काजू वाळवून ठेवता आली नाही मात्र आत्ता ती वाळवता येते. पावसाचा अंदाज बघुन काजूला दोन उन्हे द्या आणि बिंधास्त साठवणूक करा. यावर्षी जे पहिल्यांदाच काजू साठवत आहेत त्यांना कदाचित भिती वाटत असेल की पावसात दर यापेक्षा कमी झाला तर नुकसान होईल म्हणून पण त्यांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. पाऊस सुरू झाला की दर पडतो हा चुकीचा समज आहे. पक्क्या मालाला पाऊस पडुदे नाहीतर आभाळ कोसळूदे काही होत नाही. साठवलेल्या काजूला आत्ताच्या पेक्षा दर निश्चित ज्यादा मिळतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. काजू चांगली वाळवा आणि साठवा. काजू देणार का म्हणून खरेदीदार अथवा कारखानदार तुमच्या घराला विचारत येतील हा आपला शब्द आहे. मात्र माल पक्का करा, खराब काजू बाजुलाच काढा व वाळवान पक्के करून बिनधास्त रहा. आपण 160 पेक्षाही अधिक दर घेणार असा निर्धार करुन मैदानात उतरण्याचे आवाहनही एम. के. पाटील यांनी सोशल मिडीयाद्वारे केले आहे.