गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस शुक्रवारी (दि.२९) दुपारी भंडाऱ्याहून गोंदियाकडे येथे होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास २० फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील ११ प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर २९ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी दाखल होत मदत कार्याला सुरुवात केली आहे. जखमी व मृतक प्रवासी हे गोंदिया जिल्ह्यातीलच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
बसमध्ये चाळीस प्रवासी
भंडारा-गोंदिया या शिवशाही बस क्रमांक एम.एच.०९, एम १२७३ ही भंडाराहून गोंदियाकडे येत असताना गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे.