पद्मश्रीकार डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
बेळगाव : शामरंजन बहुद्देशिय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे आयोजित राष्ट्रीय संस्कृती संमेलनात यंदाचा “भारत कर्तव्यम्” समाज भूषण पुरस्कार चंदगड पत्रकार संघाचे सदस्य व बेळगाव वार्ताचे पत्रकार संजय केदारी पाटील यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व भारत सरकारचा
पद्मश्रीकार पुरस्कार प्राप्त डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. अस्मिता कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कोरोना काळात केलेले उल्लेखनिय कार्य, वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेले लिखाण व अनेक वेळा केलेले रक्तदान या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. लोकमान्य टिळक रंगमंचावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चित्रपट निर्माते संदिप राक्षे होते.
यावेळी बोलताना डॉ. रविंद्र कोल्हे म्हणाले, पुरस्कार हा सावलीसारखा असला तरी त्याने जबाबदारी वाढते. जे संकटाना सामोरे जाऊन समाजासाठी झिजतात त्यांचा सन्मान म्हणजे हा पुरस्कार असतो. द्वेशाची तटबंदी तोडायची असेल तर प्रेमाची भिंत उभी करावी लागेल. बेळगावसारख्या सीमाभागात असे सन्मान सोहळे व्यक्तिना समाजसेवा करण्याचे बळ देतात, असे सांगून पुरस्कार प्राप्त झालेल्यानी समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी भारत – पाकिस्तान (आंतरराष्ट्रीय) शूटिंग बॉलचे मुख्य पंच अशोक दाभोळकर, संमोहन उपचार तज्ञ दीपक बोडरे, सिने -नृत्य अभिनेत्री रिया पाटील, पुणेचे लेखक व चित्रपट निर्माते संदिप राक्षे, गोव्याचे जादूगार प्रेम आनंद, संयोजक डॉ. बी. एन. खरात, कृष्णा बामणे, स्वाती पवार यांच्यासह बेळगाव, गोवा, मुंबई, पूणे येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बी. एन. खरात यांनी केले. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांननी केले. आभार कृष्णा बामणे यांनी मानले.