चंदगड : देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामसभा दि.२०/१०/२०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, देवरवाडी येथे ग्रामसेवक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडली. मागील सभा कोरम अभावी तहकूब झाल्याने या ग्रामसभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी उल्लेखनीय उपस्थिती दाखविली.
या ग्रामसभेत १५व्या वित्त आयोगातील योजना व निधी, नवीन जल जीवन योजना, विधवा स्त्रियांना समाजात मानाचे स्थान देणे, बालविवाह प्रतिबंधक उपाय योजना, छ. शिवाजी महाराज पुतळा स्मारक बांधणे, बौद्ध विहार बांधणे, ग्रामपंचायत क्रीडांगण संरक्षक भिंत बांधणे, गावातील पाणंद रस्ते खुले करणे व श्रीक्षेत्र वैजनाथ देवरवाडी येथील नूतन स्थानिक सल्लागार उपसमितीची स्थापना करणे या विविध विषयावर साधक बाधक चर्चा होवून सर्व नवीन कमिट्या स्थापन करण्यात आल्या.
यावेळी माजी उपसरपंच दशरथ भोगण, गोपाळ भोगण, नारायण भोगण, दशरथ कांबळे, मनोहर सिद्धार्थ आदी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर ग्रामस्थ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. पोलीस पाटील जयवंत कांबळे, सेवा सोसायटी चेअरमन शंकर भोगण, बाला राम भोगण, संघर्ष प्रज्ञावंत, प्रा. नागेंद्र जाधव, विनोद मजुकर, शंकर वैजू भोगण, राजू करडे, लक्ष्मण परशराम भोगण, संजय भोगण आदी ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाचा निधी, कोरोना काळातील ग्राम पंचायतीचा लेखा परीक्षण अहवाल मागितला व त्याचे वाचन करण्यास सुचवले. त्यामुळे ग्रामसभेत यावर वादळी चर्चा झाली. ग्रामसेवक विठ्ठल नाईक यांनी सभेचे प्रास्ताविक, उपसरपंच गोविंद आडाव यांनी सभेचे कामकाज व आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta