कांबळे, दळवी, तुपारे ठरले उत्कृष्ट खेळाडू
तेऊरवाडी : चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित “पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३” स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महावितरण टीमने खेडूत स्पोर्ट्स ला शॉक देत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना महावितरणने ८ षटकात केलेल्या ४ बाद ९० धावांचा पाठलाग करताना खेडूतला पाच गडी बाद ७४ पर्यंत मजल मारता आली.
‘महावितरण’ने अजिंक्यपदाच्या चषकासह ‘दक्ष कलेक्शन’ फिरत्या चषकावर कब्जा केला. विजेता व उपविजेता संघ तसेच मालिकावीर विनायक कांबळे (खेडूत) सामनावीर अमोल दळवी (महावितरण), उत्कृष्ट गोलंदाज जोतिबा तुपारे (खेडूत) यांना न्यायाधीश ए सी बिराजदार, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, गोकुळचे संचालक चेतन नरके, दक्ष कलेक्शनचे मालक पी के गायकवाड, नगरसेवक अभिजीत गुरबे, बाळासाहेब हळदणकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, सचिव चेतन शेरेगार, खजिनदार संपत पाटील यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन पत्रकार टीमचे कर्णधार निंगाप्पा बोकडे यांनी केले. उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अंतिम सामन्यापूर्वी सुपरएट मधील क्वार्टर फायनल फेरीत प्राथमिक शिक्षक टीमने आरोग्य विभागाचा, चंदगड वनविभागने चंदगड पोलीसचा, खेडूत स्पोर्ट्सने एलआयसीचा तर महावितरणने तहसील कार्यालय संघाचा पराभव करुन सेमी फायनल फेरीत प्रवेश केला होता. या फेरीत खेडूत स्पोर्ट्सने प्राथमिक शिक्षक टीमला तर महावितरणाने चंदगड फॉरेस्ट विभागाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
स्पर्धेत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्रातील कार्यालयांच्या चंदगड पत्रकार संघ, बँक ऑफ इंडिया, कृषी विभाग, डॉक्टर असोसिएशन, नगरपंचायत चंदगड, पतसंस्था फेडरेशन, आजी-माजी सैनिक संघटना, प्राथमिक शिक्षक ब, वकील असोसिएशन, पंचायत समिती, पाटणे वन विभाग, बँक ऑफ बडोदा, महा-ई-सेवा केंद्र, एसटी महामंडळ, पोलीस पाटील, न्यायालय, तहसिल कार्यालय, महावितरण, चंदगड पोलिस, चंदगड वनविभाग, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षक अ, खेडूत स्पोर्ट्स, एलआयसी आदी बलाढ्य २४ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने स्पर्धेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सर्वच संघांतील खेळाडूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. माडखोलकर महाविद्यालय व हिंडाल्को मैदानावर साखळी फेरीतील सामने खेळवण्यात आले. तर क्वार्टर फायनल पासून पुढील सर्व सामने हिंडाल्को मैदानावर खेळवण्यात आले. स्पर्धेतील झालेल्या अटीतटीच्या एकूण ४६ सामन्यांना क्रिकेट शौकिनानी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावून खेळाचा आनंद लुटला. स्पर्धेत सहभागी २४ संघांना सहभागाबद्दल गौरव चिन्ह तसेच सर्व संघांतील ४०० क्रिकेटपटूंना प्रमाणपत्रांचे लवकरच समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. एखाद्या तालुका पत्रकार संघमार्फत भरवलेली अशा प्रकारची महाराष्ट्रातील बहुदा पहिलीच स्पर्धा कमालीची यशस्वी ठरली. सहभागी संघ व क्रिकेटशौकिनांकडून पुढील वर्षीही स्पर्धा भरवण्याचा आग्रह वाढल्यामुळे स्पर्धेसाठी भव्य फिरता चषक ठेवून पुढील वर्षीही स्पर्धेचे आयोजन करण्याची घोषणा चंदगड पत्रकार संघाने केली आहे.
फोटो