चंदगड : “शिक्षक समाज घडवतात, मुलांवर संस्कार करून चारित्र्यवान पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात,” असे विचार मराठी अध्यापक संघाचे एम. एन. शिवणगेकर यांनी व्यक्त केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे दरवर्षी तालुक्यातील एका मराठी शिक्षकाला दिला जाणारा “मराठी प्रेरणा पुरस्कार” यंदा राजगोळी हायस्कूलचे शिक्षक राघवेंद्र इनामदार यांना सन्मानित करण्यात आला.
“राजगोळी हायस्कूल”ने ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला, ज्यामध्ये इनामदार सरांचे मोलाचे योगदान होते. या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कवठेकर होते. मराठी संघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते इनामदार यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी पाटील यांनी इनामदार यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले आणि त्यांच्यावर एक सुंदर काव्य गीत सादर केले.
कार्यक्रमात संजय साबळे आणि जी. आर. कांबळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापक अनंत पाटील, एच. आर. पाऊसकर, मोहन पाटील, एस. पी. पाटील, कमलेश कर्णिक, विक्रम तुडयेकर यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही. आर. पाटील यांनी केले.
या सन्मान सोहळ्याने शिक्षकांचा समाजावर असलेला प्रभाव आणि योगदान अधोरेखित केले.