बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवरील देवरवाडी (ता. चंदगड महाराष्ट्र) जवळील श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे सोमवारी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी पुजारी प्रमोद बर्वे यांनी ट्युनिक नावाचे विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यानंतर चिंताजनक अवस्थेत त्यांना बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तथापि उपचाराचा फायदा न होता काल सोमवारी त्यांचे निधन झाले. सदर घटनेची नोंद केएलई हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून चंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून पुजारी बर्वे यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध घेतला जात आहे.
पुजारी प्रमोद प्रभाकर बर्वे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली व मुलगा असा परिवार आहे.