चंदगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍड्व्हेंचर एल.एल.पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी पर्वणी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील पर्यावरणासह पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट आहे. तसेच पर्यावरण संरक्षण, पर्यावरणाची होणारी हाणी टाळण्यासाठी करण्यात येणारे उपाय, त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील निसर्गसौदर्य, वन संपदा, दुर्मिळ वनस्पती यांची माहिती इतरांना व्हावी अशी अपेक्षा ठेवून या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे ही संपदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होऊन पर्यावरणाबरोबरच निसर्गासह शारिरीक आरोग्य उत्तम ठेवण्याचा एक संदेश यातून मिळणार आहे. चंदगड आगारातून खास बससेवा जेवणाची व्यवस्था सशुल्क करण्यात आली आहे. स्पर्धेची सुरुवात भवानी मंदिर पारगड येथून होईल. या स्पर्धेसाठी येणाऱ्या धावपटू, समर्थक, क्रीडा प्रेमी व पर्यटकांसाठी चंदगड आगारातून खास एसटी बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. ५ जून रोजी पहाटे ३ ते ५ पर्यंत प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्या पारगड ला रवाना होणार आहेत. अधिक माहितीसाठी 99873222271 7021074762 या मोबाईल नंबर संपर्क साधावा. हेरे, मोटणवाडी, वाघोत्रे ते पारगड मार्गावरील सर्व थांब्यावर थांबतील अशी माहिती आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन निकम यांचेसह प्रवीण चिरमुरे, रघुवीर शेलार, कान्होबा माळवे आदींनी केले आहे.
वेळापत्रक पुढील प्रमाणे : ५ जून २०२२ सकाळी ४ पर्यंत स्पर्धकांचे आगमन, ५ वाजता कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती नाष्टा, ५.३० उद्घाटन, ६ वाजता २१ किमी जंगल हाफ मॅरेथॉन (महिला), ६.१५ वाजता २१ किमी (पुरुष), ६.३० वाजता १० किमी जंगल ड्रीम रन (महिला), ६.४५ वाजता जंगल ड्रीम रन (पुरुष), ७ वाजता ५ किमी जॉय ऑफ जंगल (महिला), ७.१५ वाजता जॉय ऑफ जंगल (पुरुष), सकाळी ९ ते ११ वाजता होणाऱ्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास आमदार राजेश पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते धावपटू चंद्रकांत मनवाडकर (किणी) व तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.