पारगड (एस. के. पाटील) : निसर्ग संवर्धन व प्रबोधनासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ५ जून २०२२ रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ मॅरेथॉन स्पर्धाचीआमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात सुरवात झाली. सकाळी ७ वाजता २५ कि.मी. मॅरेथॉन व ७.३० वाजता १० कि.मी. स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरवात झाली.
आज पहाटे ४ पासून पारगडावर स्पर्धक येत होते तर काही स्पर्धक किल्ले पारगड रात्रीच मुक्कामाला आले होते. या सर्व स्पर्धकांची गडावरच रहाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. जनकल्याण संस्था मुंबई तसेच पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ऍडव्हेंचर एल.एल.पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी पर्वणी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याची संधी स्पर्धकाना मिळाली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील पर्यावरणासह पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट आहे. तसेच पर्यावरण संरक्षण, पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी करण्यात येणारे उपाय, त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील निसर्गसौदर्य, वन संपदा, दुर्मिळ वनस्पती यांची माहिती इतरांना व्हावी अशी अपेक्षा ठेवून या महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे ही संपदा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उदघाटन कार्यक्रमाला तहसिलदार विनोद रणावरे, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, पाटणे विभाग वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, चंदगड वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कर्नाटक, महाराष्ट्र राज्यासह गोवा राज्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.