बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात बिबट्या आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यावरून वनविभागाचे अधिकारी शोध घेत आहेत. येडूरसह आजूबाजूच्या गावात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने वास्तव्य केल्याच्या वृत्ताने स्थानिक ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येडूर गावातील जाधव यांच्या शेतात बिबट्या दिसल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार वनविभागाच्या अधिकार्यांनी येडूर गावाला भेट देऊन नक्की बिबट्याच आहे की अन्य कोणता प्राणी आहे, याचा शोध सुरु केला आहे. त्याशिवाय चिक्कोडी परिक्षेत्राचे वनविभागाचे अधिकारी प्रशांत गौराणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऊसाच्या शेतात सीसी कॅमेरा लावून शोध सुरु केला आहे. दरम्यान, मेंढपाळ हालप्पा टेंगळे यांनी बिबट्याने आपली मेंढी खाल्ल्याची तक्रार केली. या संदर्भात स्थानिक रहिवासी संजय कोळी आणि अनिल कोळी यांनी 5 दिवसांपूर्वी चांदूरटेक गावच्या परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती दिली आहे.
एकंदर येडूर गावासह आजूबाजूच्या गावात बिबट्याचा वावर असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहेत.