सदलगा : सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल दूधगंगेच्या प्रवाहामुळे ढासळला. या पुलाच्या पूर्व-दक्षिण रस्त्याला जोडणाऱ्या बांधकामाच्या दक्षिणेकडील बाजूस भिंतीवरील कोरलेल्या पण पुसट झालेल्या नोंदीनुसार तत्कालीन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एस्. निजलिंगाप्पा यांच्या हस्ते १९५९ सारी या पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल म्हणजे बंधारा वजा पूल पण सदलगा, एक्संबा, नेज, मलिकवाड, हिरोकुडी, चिक्कोडी, नागराळ आदी गांवातील लोकांना महाराष्ट्रातील शहरांकडे जाण्याचा जवळचा मार्ग होता. उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडविले जाऊ लागले आमी चक्क बेडकीळ भोज पर्यंतची जमीन ऊस – केळी बागायती झाल्या. आवर्षणकाळात काळम्मावाडी धरण होईतोपर्यंत पात्रातील पाणी उन्हाळ्यात संपायचे, पण हे पाणी अडविल्यामुळे किमान तीन पिढ्यांची लहान थोर लाकडी फळ्यांनी आडविलेल्या पाण्यात या पुलावरून सूर मारण्याचा आनंद लुटला आहे. या पुलाचे बांधकाम चक्क दगड आणि चुनेगच्ची आणि सिमेंट काँक्रीटच्या मिश्रणाने केलेले होते. पंधराएक वर्षांपूर्वी प्रत्येक पावसाळ्यात किमान दीड दोन महिने पुराच्या पाण्याखालीच जात असल्याने त्यावर सिमेंटच्या पाईप टाकून त्यावर पुन्हा स्लॅब टाकल्याने पाण्याखाली जाण्याचे प्रमाण तीन आठवडे ते महिन्यावर आले पण जुन्या दगडी बांधकामांवर ओझे वाढले त्यात ऊस, बस आणि अवजड वाहतूक होऊन हा पूल कमकुवत बनला. दोन्ही बाजूला लोखंडी कमानी उभ्या करुन ही अवजड वाहतूक बंद करण्यात आली आणि कांही वर्षे हलक्या वाहतुकीस खुला ठेवण्यात आला. दरम्यान आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून या पुलाच्या शेजारीच नविन उंच मोठा रुंद बंधारा वजा पूल बांधून नागरिकांची गैरसोय दूर केली आणि या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली. कुणी मासेमारी करणारे गळ टाकून बसलेले असायचे, कुणी चालत फेरफटका मारण्यासाठी या पुलावरून फिरताना दिसायचे ते आता थांबले.
या पुलाच्या बांधकामानंतर सुमारे पाच एक वर्षानंतर म्हणजेच १९६४ च्या दरम्यान किसान पुलाचे (व्हंडा) बांधकाम झाले असल्याचे समजते. या पुलामुळे सदलग्याच्या उत्तर बाजूची शेतजमीन पावसाळ्यात जाणे सोयीचे झाले. पुढे दत्तवाडी सदलगा दरम्यान मोठा पूल झाल्याने दत्त साखर कारखाना शिरोळ आणि गुरुदत्त शुगर्स टाकळी कडे ऊस वाहतुकीस सोयीचे झाले. मात्र ऊस गळीत हंगामातील अवजड वाहतूक किसान पुलावरून गेली तीस वर्षे होत असल्याने हाही पूल कमकुवत बनत आहे. इथेही पर्यायी पुलाची तजवीज करावी लागणार आहे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta