
सदलगा : हे आहे एक अत्यंत मार्मिक आणि बोलके छायाचित्र. सदलग्यातील या फोटोतील मेंढपाळ त्या पदपथाच्या कठड्याबाहेरुन जात आहे आणि त्याची सगळी मेंढरं संरक्षक कठड्याच्या आतील पदपथावरुन त्यांच्या त्यांच्या शिस्तीने जात आहेत.

आणि दुसऱ्या फोटोत कांहीं शालेय मुले फूटपाथ सोडून मुख्य रस्त्यावरुन गटागटाने जात आहेत.
मनुष्य प्राण्याला निसर्गाने अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता दिली आहे. पण, मानव आपल्या हट्टी-दुराग्रही स्वभावामुळे अपघातांना आमंत्रण देतो हे या दोन्ही चित्रावरुन स्पष्ट होते.
*गेली सांगून ज्ञानेश्वरी*
*माणसा परास मेंढरं बरी*
या ओळींचा साक्षात प्रचीती येते.
विशेषतः शालेय मुलं आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ (फूटपाथ) तयार करुन घेण्या करिता येथील सामाजिक चळवळ्यांनी खूप संघर्ष केला, अगदी केंद्रीय पातळीवर पत्रव्यवहार केले.
तत्कालीन लोकप्रतिनिधींनी ही गरज ओळखून ही बाब मनावर घेतली आणि कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणून गोडाऊन पासून खाली कल्पवृक्ष क्रॉस पर्यंतचा तीव्र उतार असलेला रस्ता फोडून पक्का डांबरी रस्ता बनविला. अवजड वाहतुकीचा प्रचंड ताण, ऊस गळीत हंगामातील ऊस वाहतूक आणि या रस्त्यालगत असणाऱ्या सर्व शाळा यांची दखल घेऊन रस्ता आणि रस्त्याच्या एकाच बाजूला कठडे तयार करुन केलेला पदपथ हा पायी जाणाऱ्या जनतेच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सोयीचा करण्यात आला.
पण, या सुरक्षा सोयीचा वापरच केला जात नाही हे सातत्याने दिसून आल्याने कांहीं सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी शाळा शाळांतून जाऊन प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनादेखील पदपथ-फूटपाथचे महत्व आणि त्याचा वापर करावा असे आवाहन.
पण, अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थी फूटपाथ सोडून मुख्य रस्त्यावरुनच गटागटाने जात असल्याचे चित्र आहे.
या गोष्टीला या मेंढरा सारख्या मुक्या प्राण्यांनी आपल्या कृतीतून हे शहाणपण शिकविण्याची वेळ यावी यापेक्षा वेगळं आणखी काय असू शकेल असा गोंधळ सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो.
या वरील छायाचित्रातील मेंढरं रहदारीच्या रस्त्यावरुन न चालत जाता फूटपाथचा अगदी योग्य वापर करत हायस्कूल कडून कुवेंपु शाळेच्या गेटपर्यंत येत असताना दिसताहेत.
म्हणून…. “माणसा परास मेंढरं बरी” हेच खरे. या उक्तीची प्रचीती येते.
Belgaum Varta Belgaum Varta