सदलगा : येथील सदरगा- एकसंबा रस्त्यावर बाबासाहेब होगार यांच्या घरासमोर रस्त्यालगतच पुरसभेच्या अखत्यारीत येत असलेले हेस्कॉमचे पथदीपचे कंट्रोल डीपी बॉक्स उघड्याच अवस्थेत दिसून येत आहेत. तिथे आतमध्ये फ्यूज आदी सर्वकाही उघड्यावर आणि जमिनीपासून केवळ एक दीड फूट उंचीवर आहे. लहान मुलांच्या अल्लड चाळ्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. नुकतेच दोन शेळ्यांना तिथे शॉक लागून एक शेळी मृत्यूमुखी पडलेली घटना घडली आहे. या उघड्या बॉक्सला दरवाजा तरी बसवावा किंवा डीपी बॉक्सची उंची तरी वाढवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या परिसरात महालिंगस्वामी, ऊर्दू हायस्कूल अशा दोन प्राथमिक, माध्यमिक शाळा असून विद्यार्थ्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. कांही अनर्थ घडण्यापूर्वीच या उघड्या डब्याला झाकणतरी बसवावा अन्यथा उंचीतरी वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. छ. शिवाजी महाराज चौक ते बाजीराव प्लॉट या एकसंबा रोडवरील पुरसभेच्या अखत्यारीत येत असलेल्या पथदीपचे नियंत्रण या कंट्रोल डीपी बॉक्सद्वारे केले जाते. पुरसभेच्या प्रशासनाने वेळीच लक्ष घालून धोका टाळावा, अशी मागणी होत आहे.