
सदलगा : येथील प्रविण इराप्पा मडिवाळ (वय २२ वर्षे) आणि त्याचा मित्र गौरव पाटील (म्हाकवे, ता. कागल) असे दोघेजण २५ सप्टेंबर रोजी सदलगा आणि म्हाकवे येथून बद्रीनाथ, केदारनाथकडे सायकल प्रवासासाठी निघाले होते. पहिला मुक्काम त्यांनी कराडमध्ये केला होता. दोघेही तरुण दररोज सुमारे १२० ते १३० किमी चा प्रवास करत, मंदिर, धर्मशाळा, आश्रम, गुरुद्वारा कार्यालये अशा ठिकाणी मुक्काम करत होते. बऱ्याच ठिकाणी लोक नाष्टा, भोजनाची सोय करत होते. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड अशा प्रवासा दरम्यान एकाच ठिकाणी पाऊस लागला, अन्यथा संपूर्ण सायकल प्रवास कसल्याही नैसर्गिक आपत्ती शिवाय सुखरुप झाला असल्याचे प्रवीणने सांगितले. गेल्या तीन चार वर्षांपासून आपण सायकलने बद्रीकेदारकडे जाऊन शिवदर्शन घेण्याची मनातील इच्छा होती ती पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले.

वाटेत विविध राज्यांतील भौगोलिक परिस्थितीचा, निसर्गाच्या आविष्काराचा आनंद घेत वेगवेगळ्या भाषांचा प्रदेश बघत अनुभवत प्रवास सुरू असताना सायकलवर कर्नाटक /महाराष्ट्र असे फलक वाचून कांहीं शिक्षक वर्ग, उत्साही लोक आमच्या सायकल प्रवासाला शुभेच्छा देत होते, सत्कार करत होते आणि आश्वासकपणे थाप पाठीवर मारल्याने आमचा सायकल प्रवासाचा उत्साह आणखी द्विगुणित झाल्याचे सांगितले. सायकल प्रवास करुन परत येताना ऋषिकेश हरिद्वार पर्यंत सायकलने आलो, तिथून रेल्वेने परत आल्याचे प्रवीणने सांगितले. एकूण २२०० किमी चा १९ दिवसांचा उत्साही सायकल प्रवास करुन आज सकाळी कोल्हापूर मध्ये आल्यानंतर प्रविण आणि गौरव असा आम्हा दोघांचा भागीरथी संस्था कोल्हापूर च्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक व चॅनल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी जाहीर सत्कार केला. तिथून सदलग्यात आल्यानंतर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सर्कल, छ. शिवाजी महाराज सर्कल, दत्त चौक आणि विविध ठिकाणी सदलगा येथे नगरसेवक राजू अमृतसम्माण्णावर, माजी स्थायी सभापती लक्ष्मीकांत पाटील, रावसाहेब पाटील (गावकामगार पाटील), शिरिष अडके, तात्यासाहेब कदम, अण्णाप्पा मडिवाळ, प्रकार कुलकर्णी, सागर गिडगल्ले, आण्णासाहेब कदम, राजू वाली, संतोष नवले आदींच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta