चिक्कोडी : चिक्कोडी आणि महाराष्ट्रातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीवरील कुडची पुलाला पूर आला आहे.
जमखंडी व उगार यांना जोडणारा कुडची पूल पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. कुडची पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच रस्ता बंद करून कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून दूधगंगा नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे. एकसंबा येथील दत्तवाड रस्त्यावरील थोरपट्टी येथील शेतकरी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीत सध्या ८५ हजार क्युसेकने पाण्याची आवक वाढल्याने चिक्कोडी उपविभागातील ८ पूल वाहून गेले आहेत.
दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी या नद्या दुथडी भरून वाहत असून निप्पाणी तालुक्यातील करदगा गावातील ग्रामदैवत बंगाली बाबा मंदिराभोवती नदी पाण्याने व्यापली आहे. अजूनही चिक्कोडी तालुक्यातील दत्तवाड – मल्लिकवाडा, भोज – करादगा, भोजवाडी – निप्पाणी तालुक्यातील कुन्नूर पूल पाण्याखाली आहेत.