
चिक्कोडी : महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील 4 पूल पाण्याखाली बुडाले आहेत.
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे आता चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत क्षणोक्षणी वाढ होत आहे. त्याशिवाय यडूर-कल्लोळ, मांजरी-सौंदत्ती, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दानवाड हे 4 पूलवजा बंधारे पाण्याखाली बुडाले आहेत. कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नद्यांची पातळी एकाच दिवसात 1 फुटाने वाढली आहे. दरवर्षी पुरामुळे त्रस्त होणार्या नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीचे पाणी वाढल्याने शेतकरी आपले पंप संच सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाकडून एनडीआरएफ टीम आणि नोडल अधिकारी नदीकाठावर तैनात करण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये नदीकडे कोणी जाऊ नये यासाठी अधिकारी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta