बेळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार दंड अशी शिक्षा विशेष पोक्सो न्यायालयाने आज (ता. ३) ठोठाविली. श्रीसंगम कृष्णात निकाडे (रा. कुर्ली, ता. चिक्कोडी) असे आरोपीचे नाव आहे. १४ जुलै २०१६ मध्ये प्रकरणाची नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील एका अल्पवयीन मुलीला श्रीसंगम निकाडे याने लग्नाचे आमिष दाखविले. तिचे अपहरण करून पहिल्यांदा कोल्हापूर व येथून पुण्याला घेऊन गेला. येथून परत कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात आणून त्याठिकाणी पती-पत्नी असल्याचे घर मालकाला सांगत एका छताखाली राहिला. या दरम्यान तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत मुलीची सुटका केली, आरोपी विरोधात निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यात १४ जुलै २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर भरणी यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची अंतिम सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात झाली. आरोपीला २० वर्षे शिक्षा आणि दहा हजार रुपये ठेवण्यात आला. विशेष सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.