अंकली : येडूरवाडी (ता. चिकोडी) येथील रहिवासी व सध्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेल्या जवानाचा पश्चिम बंगाल येथे अपघाती मृत्यू झाला. सूरज धोंडीराम सुतार (वय 30) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
अंकलीजवळील येडूरवाडी येथील जवान सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगाल येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी पत्नीला घेऊन तो सेवेच्या ठिकाणी जात होता. यावेळी रिक्षातून उतरत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले असून, सन 2012 साली ते भारतीय सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आज (मंगळवार) सकाळी समजताच गावावळ शोककळा पसरली आहे.
बुधवारी सकाळी दिल्ली विमानाने त्यांचे शव सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर ते गावी नेले जाणार असून, तेथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा व पोलीस प्रशासनाने कळवले आहे.