बेळगाव : बेळगावातील कणबर्गी येथे सीईएन पोलिसांनी एका घरात भरवलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा मारून २ लाख १० हजार रुपये रोख, ५ महागडे मोबाईल जप्त केले. याप्रकरणी ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी कारवाईचा विळखा आवळण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीईएन पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री कणबर्गीतील पाटील गल्ली येथील भैरगौडा पाटील यांच्या घरात भरवण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर सापळा रचून छापा टाकला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात जुगारी अड्डा भरविल्याचे आढळून आले.
जुगारात लावलेले २ लाख १० हजार रुपये, ४० हजार रुपये किमतीचे सॅमसंग आणि विवो कंपनीचे ५ मोबाईल तसेच पत्त्याचा कॅट जप्त करण्यात आला. याप्रकरणी भैरगौडा जोतिबा पाटील (वय ४२ वर्षे), अनिकेत अशोक पाटील (वय ३३ वर्षे), वज्रय्या मनोहर वेर्णेकर (वय ३८ वर्षे), राकेश शाम नंदगडकर (वय ३६ वर्षे), बसवराज कल्लाप्पा नबापुरी (वय ३७ वर्षे), गदीगेप्पा बसप्पा तळवार (वय ४८ वर्षे) आणि शिवानंद सिद्देगौडा भरमशेट्टी (वय २८ वर्षे) या सातजणांना अटक करण्यात आली. बेळगाव सीईएन पोलिस ठाण्याचे सीपीआय बी. आर. गड्डेकर व सहकाऱ्यांनी हि कारवाई केली.