मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) छापेमारी सुरु केली आहे. ईडीचे सहा ते सात अधिकारी देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या घरी कारवाई करत आहेत.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पारमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुली करण्याचे गंभीर आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सीबीआयने तपास सुरू केला. तपासाअंती सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीनेही याप्रकरणात उडी घेऊन तपास सुरु केला होता.
सीबीआयने पहिल्यांदा देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर आता ईडीने शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून देशमुखांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी छापेमारी सुरु केली आहे. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ईडीचे सहा ते सात अधिकारी देशमुख यांच्या वरळीतील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या घरी कारवाई करत आहेत. यात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्राची तपासणी सुरु आहे. ईडीच्या कारवाईमुळे सुखदा इमारती बाहेर स्थानिक पोलिसांकड़ून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनिल देशमुख हे मुंबईत नसून पुण्यात असल्याचे समजते.