नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून पाहत असताना लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. या घटनेतील मूल्यांची जोपासना करण्यासाठी प्रयत्न करूया, असे मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत. 1975 ते 1977 या कालावधीत संस्थांचे पध्दतशीरपणे खच्चीकरण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.