नेसरी : येथे महाराष्ट्र अनिस नेसरी व गडहिंग्लज शाखेच्या पुढाकाराने आणि नेसरी वाचन मंदिर व पत्रकार संघाच्यावतीने येथील विवाहित महिला प्रियांका समीर सुतार, (वय 30) यांच्या डोक्यावरील जटा काढण्यात आल्या. अनिसचे राज्याचे सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोक मोहिते आदिनी कात्री चालवून प्रियांका यांच्या डोक्यावरील मोठ्या जाडजूड, सुमारे एक किलो वजनाच्या जटा काढून त्यांच्या मानेवरील ओझे कमी केले.
कार्यवाह वसंतराव पाटील, एस एस मटकर, सूर्यकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम घेण्यात आला.
केडंबे, ता. जावळी, जि.सातारा येथील समीर सुतार हे नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात.त्यांच्या पत्नी प्रियांका यांच्या डोक्यामध्ये दोन वर्षांपूर्वी साधारण जट निर्माण झाली होती. मात्र त्यांच्या कुटुंबाने यल्लमा देवीची जट असल्याच्या भावनेतून ती जट काढली नाही. हळूहळू ती वाढत गेल्याने त्यांचे सामान्य जीवन जगणे मुश्किल बनले. सुमारे एक किलो वाजनाच्या मानेवरील ओझ्यामुळे त्यांना शारीरिक त्रास होऊ लागला. कोणत्याही कार्यक्रमाणा जाणे त्यांनी टाळले. प्रियंका यांचे पती समीर यांनी आपल्या पत्नीच्या जटाबद्दलची व त्यामुळे होणाऱ्या मानसिक स्थितीबद्दल माहिती पुणे येथील उद्योजक नामदेव सुतार यांना सांगितली. त्यांनी आपल्या नेसरी गावी संपर्क साधला. येथील नेसरी वाचन मंदिर या ग्रंथालयात अनिस तर्फे जटानिर्मूलन करून प्रियांका यांचे शारीरिक व मानसिक ओझं कमी केले.
यावेळी प्रियांका सुतार यांचा शिवलीला हिडदुगी, निर्मला सुतार, शीतल शिंदे, माधुरी कुंभार यांच्या हस्ते भर आहेर देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एम डी रेडेकर, अमोल बागडी, चंद्रकांत संकपाळ आदि उपस्थित होते. स्वागत रवींद्र हिडदूगी यांनी केले. प्रास्ताविक टी बी कांबळे यांनी केले. आप्पासाहेब कुंभार यांनी आभार मानले.